दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजिनक गणपतींचं विसर्जन होणार असल्याची माहिती मिळत आहे. थोड्याच वेळात प्रतिष्ठित मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. गणेश गल्लीच्या राजाची 8.30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार असून लालबागच्या राजाची 9.30 वाजता महाआरती 10.30 वाजता मंडपातून प्रस्थान होणार आहे.
तसेच सकाळी 10 नंतर चिंचपोकळीच्या चिंतामणी विसर्जनासाठी दर्शन मंडपातून बाहेर पडेल. लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी दर्शन मंडप परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.